नवी दिल्ली – मान्सूनच्या सुरुवातीलाच रोजच्या आहारात महत्त्वाचा घटक असलेल्या टोमॅटोचे दर वाढले आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये टोमॅटोचा दर प्रति किलो 70 रुपये झाला आहे. त्यामुळे इंधनाच्या दरवाढीने त्रस्त झालेल्या दिल्लीकरांना पुन्हा महागाईचे चटके जाणवू लागले आहेत.
पावसाने टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. तर घाऊक बाजारपेठत टोमॅटोची आवक कमी झाल्याने हे दर वाढले आहेत. मात्र, पुढील महिन्यात हिमाचल प्रदेशातून टोमॅटोची आवक सुरू झाल्यानंतर हे दर घसरतील, असे भाजीमंडईतली घाऊक व्यापाऱ्यांने सांगितले.
गेल्या महिन्याच्या तुलनेत 995 टक्क्यांनी दरवाढ-
दिल्लीतील आझादपूर बाजारपेठेत महिनाभरापूर्वी टोमॅटोचा दर हा प्रति किलो 1.25 ते 4.25 रुपये प्रति किलो होते. सध्या, घाऊक बाजारपेठेत टोमॅटोचे दर प्रति किलो 6.44 रुपयावर पोहोचले आहेत. या घाऊक बाजारपेठेत 2 जुलैला टोमॅटोचा दर वाढून प्रति किलो 52 रुपये झाले होते. हा दर मागील महिन्याच्या तुलनेत 995 टक्क्यांनी अधिक आहे. घाऊक बाजारपेठेत दर वाढल्याने दिल्ली-एनसीआरमध्ये टोमॅटो प्रति किलो 80 रुपयांनी विकण्यात येत आहेत. तर ग्रेटर नोएडात ग्राहकांना 1 किलो टोमॅटोसाठी 70 रुपये मोजावे लागत आहेत.
आवक निम्म्याने घटली-
आझादपूर कृषी उत्पन्न विपणन बाजार समितीचे आदिल अहमद खान यांनी टोमॅटोची आवक निम्म्याने घटल्याचे सांगितले. पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने सर्वच भाजीपाल्यांचे दर वाढणार आहेत. कारण, इंधनाचे दर वाढल्याने भाजीपाल्यांच्या वाहतुकीचा खर्च वाढल्याचे खान यांनी सांगितले. हिमाचल प्रदेशामधून 90 टक्के टोमॅटो बाजारात येत आहेत. तर कर्नाटक आणि हरियाणामधून केवळ 10 टक्के टोमॅटोची बाजारात आवक होत असल्याची त्यांनी माहिती.