महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 5, 2020, 7:23 PM IST

ETV Bharat / business

टीसीएसचे भांडवली मूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक; ठरली देशातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी

रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर केवळ टीसीएसला भांडवली मूल्यात १० लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठणे शक्य झाले आहे. टीसीएसने बायबॅक शेअरची योजना प्रस्तावित असल्याचे जाहीर केल्याने कंपनीच्या शेअरच्या किमतीत वाढ झाली आहे.

टीसीएस
टीसीएस

नवी दिल्ली - टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही १० लाखांहून भांडवली मूल्य असलेली देशातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी झाली आहे. टीसीएसच्या शेअरच्या किमती वाढल्याने कंपनीच्या भांडवली मूल्यात आज अचानक वाढ झाली आहे.

टीसीएसचे संचालक मंडळ शेअर बायबॅक घेण्यावर विचार करणार आहे. हे कंपनीने जाहीर केल्याने टीसीएसच्या शेअरची किंमत आज ७ टक्क्यांनी वाढली आहे.

मुंबई शेअर बाजारात टीसीएसच्या शेअरची किंमत ७.३० टक्क्यांनी वाढून प्रति शेअर २ हजार ७०६.८५ रुपये आहे. तर निफ्टीत टीसीएसच्या शेअरची किंमत ७.५५ टक्क्यांनी वाढून प्रति शेअर २ हजार ७१३.९५ रुपये आहे. शेअरची किंमत वाढल्याने टीसीएसचे भांडवली मूल्य हे ६९ हजार ८२.२५ कोटींनी वाढले आहे.

टीसीएसचे भांडवली मूल्य गेल्या महिन्यात ९ लाख कोटी रुपये झाले होते. तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे भांडवली मूल्य हे सध्या १४ लाख ९५ हजार १८७.९५ कोटी रुपये आहे. टीसीएसचे संचालक मंडळ सप्टेंबरच्या तिमाहीची कामगिरी लवकरच जाहीर करणार आहे. तसेच दुसरा अंतरिम लाभांश हा समभागधारकांना (शेअर होल्डर) बैठकीत जाहीर करणार आहे. टीसीएसने २०१८ मध्ये १६ हजार कोटी रुपयांचा शेअरचा बायबॅक प्रोग्रॅम जाहीर केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details