नवी दिल्ली - टाटा मोटर्सचे शेअर हे १७ टक्क्यांनी वधारले आहेत. त्यामुळे कंपनीच्या भांडवली मुल्यात ७ हजार १०३ कोटींची वाढ झाली आहे. टाटा मोटर्सने दुसऱ्या तिमाहीदरम्यान नफा नोंदविल्याने कंपनीचे शेअर वधारले आहेत.
मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्सचे शेअर १६.६३ टक्क्यांनी वधारून प्रति शेअर १७२.५५ रुपये झाले आहेत. निफ्टीत टाटा मोटर्सचे शेअर १८.५८ टक्क्यांनी वधारून १७५.४५ रुपये झाले आहेत. शेअरची किंमत वाढल्याने टाटा मोटर्सचे भांडवली मूल्य हे ७ हजार १०३.२ कोटींनी वाढून ४९ हजार ८२१ कोटी रुपये झाले आहे.
शेअर बाजार आणि निफ्टीत दोन्ही ठिकाणी टाटा मोटर्सचे शेअर सर्वात अधिक वधारले आहेत. एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधक विश्लेषक अश्विन पाटील म्हणाले, अपेक्षेहून टाटा मोटर्सची दुसऱ्या तिमाहीत कामगिरी झाली आहे. मुंबई शेअर बाजारात ९४.१७ लाख शेअरचा व्यवहार झाला आहे, तर निफ्टीत टाटा मोटर्सच्या १८ कोटी शेअरचा व्यवहार झाला.
हेही वाचा-शेअर बाजार ५८२ अंकाने वधारून बंद; एलटीसीजीसह इतर करात मिळणार सवलत?
पालक कंपनी टाटा सन्सकडून १० हजार कोटी रुपये घेण्यालाही टाटा मोटर्सच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. टाटा मोटर्सने दुसऱ्या तिमाहीत ६५ हजार ४३१.९५ कोटी रुपये महसूल मिळविला आहे. गेल्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्सने ७१ हजार ९८१.०८ कोटी रुपये महसूल मिळविला होता. टाटा मोटर्सने अधिग्रहण केलेली जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) ही नफ्यात आल्याने टाटा मोटर्सची कामगिरी सुधारली आहे.