मुंबई- शेअर बाजार निर्देशांकात ४१४.३८ अंशाची वाढ होऊन तो ३८,२९४.७८ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ११६.१५ अंशाने वधारून ११,३५०.७० वर पोहोचला. अमेरिका व चीनमधील व्यापारी वादावर तोडगा काढण्यात येत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी जाहीर केले. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी उत्साह दाखविला आहे.
शेअर बाजारात सकाळच्या सत्रात वेदांत, टाटा स्टील, ओएनजीसीसी, एसबीआय, कोटक बँक, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी ट्विन्स, इन्फोसिसचे शेअर ४ टक्क्यांपर्यंत वधारले. टीसीएसच्या मागील तिमाहीत नफ्यात वाढ होवून ८ हजार ४२ कोटींचा नफा नोंदविला आहे. तरीही टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) शेअर हे ३ टक्क्यापर्यंत घसरले. टेक महिंद्रा, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि सन फार्माचे शेअर हे १ टक्क्यापर्यंत घसरले.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआय) गुरुवारी भांडवली बाजारामधून २६३.११ कोटींचा निधी काढून घेतला. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ५०२.६७ कोटींच्या शेअरची खरेदी केली.
जगभरातील शेअर बाजाराचे निर्देशांक गुरुवारी वधारले-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या उपपंतप्रधानांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेत असल्याचे गुरुवारी माध्यमांना सांगितले. तसेच चीनबरोबरील व्यापारी वादाबाबत तडजोडीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचेही त्यांनी म्हटले होते. या वृत्तानंतर शांघाय, हाँगकाँग, सेऊल आणि टोकियोचे शेअर लक्षणीय प्रमाणात वधारले होते. वॉल स्ट्रीटवरील शेअर हे गुरुवारी वधारले होते.
कारखान्यातील उत्पादनांची आकडेवारी आणि इन्फोसिसच्या तिमाहीतील कामगिरीच्या आकडेवारीकडे देशातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेले आहे. मागील सत्रात शेअर बाजार २९७.५५ अंशाने घसरून ३७,८८०.४० वर पोहोचला.