मुंबई- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय जाहीर केल्याचे शेअर बाजारात सकारात्मक पडसाद उमटले आहेत. शेअर बाजाराच्या निर्देशांकाने १६०० अंशाने उसळी घेतली आहे.
भारतीय कंपन्यांच्या करात कपात करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत परिषदेच्या अध्यक्ष तथा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला. यानंतर मुंबई शेअर बाजार निर्देशांक सकाळी साडेअकरा वाजता १६०७.९४ अंशाने वधारून ३७,७०१.४१ वर पोहोचला. तर निफ्टी ५० चा निर्देशांक हा ३६२.९५ अंशाने वधारून ११,०६७.७५ वर पोहोचला.
शेअर बाजारातील उसळीचा सर्वात अधिक लाभ मारुती, एम अँड एम, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, येस बँक, टाटा स्टील, एल अँड टी, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो आणि रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला बसला आहे. या कंपन्यांचे शेअर ९ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. टीसीएस आणि एनटीपीसीचे शेअर मात्र घसरले आहेत.
रुपया हा डॉलरच्या तुलनेत ६६ पैशांनी वधारून ७०.६८ वर पोहोचला.
केंद्रीय वित्तमंत्रालयाने यापूर्वी विदेशी गुंतवणूकदार संस्थांवरील प्रस्तावित अधिभार कर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच शेअरच्या विक्रीनंतर मिळणाऱ्या भांडवली लाभावरही अतिश्रीमंत कर लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले. यामध्ये विदेशी गुंतवणुकदारांचाही समावेश करण्यात आला आहे.