मुंबई -शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५८५ अंशाने घसरला आहे. इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएसच्या शेअरला मोठा फटका बसला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५८५.१० अंशाने घसरून ४९,२१६.५२ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १६३.४५ अंशाने घसरून १४,५५७.८५ वर स्थिरावला.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
एचसीएल टेकचे शेअर सर्वाधिक सुमारे ४ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यापाठोपाठ इन्फोसिस, डॉ. रेड्डीज, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा आणि एनटीपीसीचे शेअर घसरले आहेत. तर दुसरीकडे आयटीसी, बजाज ऑटो, एम अँड एम, मारुती आणि भारती एअरटेलचे शेअर वधारले आहेत.
हेही वाचा-नागपुरात कोरोनाचे थैमान सुरु असताना ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस
कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने गुंतवणुकदारांची वाढली चिंता-
देशात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने कॉर्पोरेट क्षेत्राच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम होण्याची भीती आहे. पुन्हा टाळेबंदी लागू होईल, अशी गुंतवणुकदारांना चिंता वाटत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून २०२३ पर्यंत व्याजदर जवळपास शून्य टक्के राहिल, अशी गुंतवणुकदारांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.४० टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ६७.७३ डॉलर आहेत.
हेही वाचा-...तर वाझेंचाही होईल मनसुख हिरेन! खा. नवनीत राणांनी व्यक्त केली भीती