मुंबई- शेअर बाजाराचा निर्देशांक आज ५०५.७२ अंशाने वधारला आहे. या तेजीनंतर शेअर बाजाराने निर्देशांकाचा ४४,६५५.४४ हा नवा उच्चांक गाठला आहे. निफ्टीचा निर्देशांक १४०.१० अंशाने वधारून १३,१०९.०५ वर स्थिरावला आहे. आयटी कंपन्या, वित्तीय कंपन्यांचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत.
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मुल्यात झालेली वाढ आणि आशिया बाजारातील सकारात्मक स्थिती या कारणांनी शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. क्षेत्रनिहाय निर्देशांकात स्थावर, दूरसंचार आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर ३.४९ टक्क्यांनी वधारले.
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर-
सन फार्माचे सर्वाधिक ५ टक्क्यांहून शेअर वधारले. इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, ओएनजीसी, भारती एअरटेल, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि बजाज ऑटोचे शेअर वधारले. दुसरीकडे कोटक बँक, नेस्ले इंडिया, टायटन, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आणि एनटीपीसीचे शेअर घसरले.
हेही वाचा-दिलासादायक! सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटी संकलन १ लाख कोटी रुपयांहून अधिक
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शुक्रवारी ७,७१२.९८ कोटी रुपयांच्या शेअरची शुक्रवारी खरेदी केली. रुपयाचे मूल्य हे डॉलरच्या तुलनेत ३७ पैशांनी वधारून ७३.६८ रुपये आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेहून अधिक सुधारत आहे. उत्पादनात सुधारणा झाल्याने विकासदराती घसरणीचे प्रमाण कमी होऊन ७.५ टक्के आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर हे ०.१० टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ४७.७३ डॉलर आहेत.
हेही वाचा-एमएसएमईकरता एकवेळ कर्जफेड पुनर्रचना; सीडबीकडून स्वतंत्र पोर्टल सुरू
देशातील अर्थव्यवस्थेत असे आहे चित्र-
देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक बातमी आहे. सलग दुसऱ्या महिन्यात वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन हे १ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. जीएसटी संकलन नोव्हेंबरमध्ये १.०४ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. ऑक्टोबरमध्ये जीएसटीचे संकलन हे १.०५ लाख कोटी रुपयांहून अधिक होते, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. कोरोना महामारीचा फटका बसलेली अर्थव्यवस्था काहीअंशी सावरत आहे. असे असले तरी जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत पहिल्या तिमाहीच्या तुलनेत देशाच्या विकासदरात ७.५ टक्के घसरण म्हणजे उणे ७.५ टक्के विकासदर राहिला आहे. या घसरणीने देशात आर्थिक मंदी असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. एप्रिल-जुनच्या तिमाहीत विकासदरात २३.९ टक्के घसरण झाली होती.