मुंबई- युक्रेन रशिया यांच्यातील संघर्ष टोकाला गेला असून रशियाने युद्धाची ( Russia-Ukraine Conflict ) घोषणा केली आहे. रशियाचे रष्ट्रपती पुतीन यांनी युक्रेनने सैन्य माघारी घेण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा युद्ध अटळ असल्याची घोषणा त्यांनी केली. युक्रेन-रशियाच्या संघर्षाची ठिणगी भारतात सुद्धा पडली आहे. भारतात शेअर बाजार गडगडला असून इंधनाचा देखील भडका उडाला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची दाट शक्यता आहे.
सेन्सेक्स घसरला -
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1 हजार 428.34 अंकानी खाली ( Sensex ) आला आहे. त्यामुळे एकुण सेन्सेक्स 55 हजार 803.72 अंकावर स्थिरावर आहे. तर निफ्टी 514 अंकांच्या घसरणीसह 16,548 वर उघडला आहे. पुतीन यांच्या लष्करी कारवाईचा भारतीय बाजारावर परिणाम पडला आहे. त्यामुळे अनेक गुंतवणुकदारांचे नुकसान झाल्याने भीतीचे वातावरण आहे.
इंधनाचा भडका -
युक्रेन हा कच्चा तेलाचा आणि खाद्यतेलाचा प्रमुख निर्यातदार देश आहे. भारतात युक्रेनमधून इंधनाची आणि खाद्यतेलाची आयात केली जाते. युक्रेनमध्ये आणीबाणी लागली असून युद्धसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहे. इंधनाचा पुरवठा होत नसल्याने भारतात कच्चा तेलाच्या किंमती प्रती बॅरल 100 डॉलर्सपेक्षाही अधिक झाल्या आहेत. त्यामुळे पट्रोल-डिझेल दरवाढ होणार असून सर्वसामान्यांना फटका बसणार आहे.
रशिया-युक्रेन वाद -
सोव्हिएत युनियनमधून वेगळा झाल्यापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत आहे. युक्रेन हा रशियाचाच भाग असून त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे. मात्र, अनेक रशियन हे स्वतंत्र अस्तित्व मान्य करत नाहीत. अशात युक्रेन आणि नाटो देशांची जवळीक हा रशियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. युक्रेन आणि रशियामधील संघर्षाने आंतरराष्ट्रीय राजकरणात वादंग पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - Russia-Ukraine crisis : पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले, लष्करी मोहिमेची घोषणा
युद्धाचा काय होणार भारतावर परिणाम? -
रशिया-युक्रेनमध्ये असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सद्या आंतराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरल 93 डॉलर असलेले तेलाचे दर वाढून 100 डॉलर प्रती बॅरल पोहोचला आहे. यामुळे भारतात महागाई वाढण्याची शक्यता आहे. भारताने 2021मध्ये रशियाकडून 43,400 बीपीडी तेल आयात केले आहे. जो एकूण आयात केलेल्या तेलाच्या 1 टक्के आहे. तसेच रशियाच्या नैसर्गिक वायूच्या निर्यातीत भारताचा वाटा 0.2 टक्के आहे. GAIL (इंडिया) लिमिटेडने Gazprom सोबत वार्षिक 2.5 दशलक्ष टन LNG खरेदी करण्यासाठी 20 वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केल्या आहे.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, भारतीय सैन्यातील 60 टक्के शस्त्रांची पुर्तता रशियाकडून होते. यामध्ये रशियाकडून मिळणाऱ्या एस-400 या एअर डिफेन्स सिस्टीमचाही समावेश आहे. जर रशिया-युक्रेन युद्ध झालंच तर रशियाकडून शस्त्रपुरवठा बंद होऊ शकतो. तसेच रशिया आणि चीन यांच्यात चांगले संबंध आहे. जर रशिया-युक्रेन युद्ध पेटले तर चीन रशियाला समर्थन करू शकतो. एकीकडे भारत चीन सीमेवर तणाव वाढलेला असताना अशा परिस्थितीचा फायदा चीन घेऊ शकतो. याहूनही महत्त्वाचं म्हणजे, जरी भारत आणि रशियामध्ये चांगले संबंध असले तरी चीनची मदत मिळाल्यास रशिया भारताच्या विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेवटचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, यासर्व प्रकरणात अमेरिकेने युक्रेनचे समर्थन केले आहे. अशात भारताला रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांशी संबंध चांगले ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ज्याप्रकारे भारत शस्त्रांसाठी रशियावर अवलंबून आहे. त्याप्रकारे इतर क्षेत्रात भारत अमेरिका आणि युरोपीय देशांवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत भारताला मध्यम मार्ग काढावा लागणार आहे.