मुंबई- शेअर बाजाराची सकाळच्या सत्रात अस्थिरतेने सुरूवात झाली. दिवसाखेअर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ६०० अंशाने घसरण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक ५९९.६४ अंशाने घसरून ३९,९२२.४६ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १५९.८० अंशाने घसरून ११,७२९.६० वर स्थिरावला.
या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण-
इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये सर्वात मोठी ३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यापाठोपाठ एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा स्टीलच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. भारती एअरटेलचे शेअर सर्वाधिक ४ टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. दुसऱ्या तिमाहीत भारती एअरटेलच्या महसुलात वाढ झाल्याने कंपनीचे शेअर वधारले आहेत. एम अँड एम, मारुती आणि एल अँड टीचे शेअरही वधारले आहेत.
या कारणांनी शेअर बाजाराच्या निर्देशांकात झाली घसरण
युरोपियन शेअर बाजारांमधील घसरण आणि कोरोनाबाधितांची वाढत्या संख्येने शेअर बाजारावर परिणाम झाल्याचे विश्लेषकांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ३.२० टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ४०.२८ डॉलर आहेत.