मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी युद्धाचा अजूनही शेअर बाजारावर परिणाम दिसून येत आहे. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक २३.९६ अंशाने घसरून ३७,४३९ वर पोहोचला. डॉलरच्या तुलनेत २६ पैशांची घसरण होवून रुपया ७०. १८ वर स्थिरावला.
निफ्टीच्या निर्देशांकात ७.८५ अशांची घसरण होवून निर्देशांक हा ११,२७१.०५ वर पोहोचला. एल अँड टी, टाटा स्टील, एम अँड एम, एनटीपीसी, सन फार्मा, एचडीएफसी ट्विन्स, कोटक बँक, येस बँक, सन फार्मा या कंपन्यांच्या शेअरमध्ये १.९८ टक्के घसरण झाली. तर एसबीआय, टीसीएस, एचयूएल, ओएनजीसी, बजाज फायनान्स, वेदांत, हिरो मोटोकॉर्प, एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअर हे १.३५ टक्क्यापर्यंत वाढले आहेत.
चीन व अमेरिकेमध्ये व्यापारी तणाव निर्माण झाल्यानंतर आशिया खंडातील बहुतेक शेअर बाजारामध्ये घसरण झाली आहे. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ९५.९२ अंशाची घसरण झाली होती.
या कारणामुळे रुपयाची झाली घसरण-
रुपयाची डॉलरच्या तुलनेत २६ पैशांची घसरण होवून तो ७०. १८ वर स्थिरावला आहे. अमेरिका चीनमध्ये व्यापारी चर्चा शुक्रवारी फिस्कटली. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या उत्पादनांवरील आयात शुल्क हे दुप्पट करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून चीनही अमेरिकेच्या उत्पादनांवरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेणार आहे. दोन महाशक्तींमधील व्यापारी युद्ध भडकण्याची चिन्हे असल्याने जगभरातील गुंतवणुकदार चिंतित आहेत. व्हिसाचे कठोर नियम, विदेशी गुंतवणुकदारांनी भांडवली बाजारामधून पैसे काढून घेण्याचे वाढलेले प्रमाण आणि गुंतवणुकदारांची सावधगिरीची भूमिका हीदेखील रुपयाच्या घसरणीचे कारणे आहेत.