मुंबई- शेअर बाजारासह निफ्टीने निर्देशांकाचा नवा उच्चांक नोंदविला आहे. मुंबई शेअर बाजारासह निफ्टीचा निर्देशांक सलग सहाव्या दिवशी वधारला आहे. वित्तीय कंपन्या, ऑटो आणि आयटी कंपन्यांचे शेअर वधारले.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १३३.१४ अंशाने वधारून ४७,७४६.२२ वर स्थिरावला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ४७,८०७.८५ हा उच्चांक दिवसभरात गाठला होता. तर निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर ४९.३५ अंशाने वधारून १३,९८१.९५ वर स्थिरावला. निफ्टीने १३,९९७ हा निर्देशांकाचा उच्चांक दिवसभरात गाठला होता.
हेही वाचा-आंतरराष्ट्रीय विमान सेवेच्या स्थगतीत ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढ
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर ४ टक्क्यांहून अधिक वधारले. तर बजाज फायनान्सचे २.६३ टक्क्के तर मारुतीचे शेअर २ टक्क्यांनी वधारले. महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा, एचयूएल, कोटक बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एशियन पेंट्सचे शेअर घसरले.
हेही वाचा-year Ender 2020: उद्योगजगताच्या वर्षभरातील ठळक घडामोडींचा मागोवा
कोरोना लसीला इंग्लंड सरकारकडून मंजुरी-
शेअर बाजार खुला झाल्यानंतर गुंतवणुकदारांनी नफा नोंदविण्याकरता शेअर विक्री केली होती. मात्र, युरोपियन शेअर बाजारमुळे देशातील शेअर बाजार पुन्हा तेजीत येण्यास मदत झाली. इंग्लंड सरकारने ऑक्सफोर्ड विद्यापीठाची अॅस्ट्राझेनेका ही कोरोनावरील लस वापरण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे युरोपियन शेअर बाजारात तेजी निर्माण झाली.