मुंबई - शेअर बाजाराच्या सकाळच्या सत्रातच ३०० अंशाची घसरण झाली. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेअर बाजारालाही घसरणीचा 'चटका' बसला आहे.
शेअर बाजाराचा निर्देशांक हा २१०.०२ अंशाने वाढून ३७,१११,२९ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा ६४.१५ अंशाने वाढून ११,०११.७५ वर पोहोचला.
तज्ज्ञांच्या मतानुसार, सौदी अरेबियामधील दोन मोठ्या तेल प्रकल्पावर ड्रोन हल्ले झाल्यानंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. हा तेल प्रकल्प जगातील सर्वोत तेल उत्पादन घेणाऱ्या सौदी अरेबियाची सरकारी कंपनी अॅरॅम्कोच्या मालकीचा आहे. सौदीच्या एकूण तेल उत्पादनात ५० टक्के घट झाल्याचेही सौदी अरेबियाचे उर्जामंत्र्यांनी रविवारी जाहीर केले. या ड्रोन हल्ल्याचा निश्चितच भारतासारख्या विकसनशील देशावर परिणाम होणार आहे. मध्यम कालावधीसाठी अनिश्चितता होवून शेअर बाजार अस्थिर राहिल, असे मत कोटक सिक्युरिटीजचे व्यवसाय प्रमुख आशिष नंदा यांनी सांगितले. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने भारताच्या आयातीच्या खर्चात वाढ होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू कंपनी एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी, गॅस्टोल इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर हे ७ टक्क्यापर्यंत घसरले. सकाळच्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत ६८ पैशांनी घसरून ७१.६० वर पोहोचला.
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
सर्वात अधिक एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, येस बँक, एचडीएफसी, एसबीआय, टाटा मोटर्स, मारुती, टाटा स्टील आणि अॅक्सिस बँकेचे शेअर २ टक्क्यापर्यंत घसरले. तर ओएनजीसी, टीसीएस, एचयूएल, टेकएम, पॉवरग्रीड, सनफार्मा, इन्फोसिस, आयटीएसी, एचसीएल टेक आणि एनटीपीसीचे शेअर २.४५ टक्क्यांनी वाढले.
हे गुंतवणुकीची दिशा ठरविणारे आहेत निर्णय
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी निर्यातवाढीसाठी ७० हजार कोटींची योजना जाहीर केली. तसेच रखडलेल्या गृहप्रकल्पांसाठी १० हजार कोटीची रक्कम देण्यासाठी विशेष खिडकी सुरू करणार असल्याचे जाहीर केले. घाऊक बाजारपेठेतील महागाईचा निर्देशांक जाहीर होणार आहे. याकडे शेअर बाजारात सहभागी होणाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
- अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून दोन दिवसात व्याजदरावर निर्णय होणार आहे. याकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेले आहे.
- शुक्रवारी शेअर बाजाराने निर्देशांक २८०.७१ अंशाने वधारून तेजी अनुभवली होती. या तेजीनंतर दिवसाअखेर निर्देशांक ३७,३८४.९९ वर पोहोचला होता.