मुंबई - भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. शेअर मार्केटने पुन्हा एकदा इतिहास रचत 58 हजारांचा पल्ला गाठला आहे. सेन्सेक्स पहिल्यांदाच 58 हजारांच्या पार गेला आहे. आज सकाळच्या सत्रात मार्केट सुरु होताच 229 अंकांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे सेन्सेक्स 58,081.12 वर पोहचला आहे. तर निफ्टीत 78 अंकांची वाढ पाहायला मिळाली. यामुळे निफ्टी 17,311 अंकांवर पोहोचलाय.
गेल्या एक वर्षापासून संपूर्ण देशात कोरोनाचे थैमान सुरू आहे. मागील वर्षी जेव्हा लॉकडाऊन लावण्यात आला, तेव्हा त्याचे पडसाद हे शेअर बाजारात उमटताना दिसले. परंतु या वेळेस कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. तरीही शेअर बाजारात 2020 च्या तुलनेने पडझड कमी स्वरूपात पाहायला मिळाली.
सध्या बाजारात कोणतीही नकारात्मक बातमी नाही. ज्याचा बाजारावर काही वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळातही वेग कायम राहणे अपेक्षित आहे. यासोबतच बाजारात मान्सूनचा लाभही मिळत आहे. तथापि, तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की अफगाणिस्तान, इराणसह अनेक देशांमध्ये राजकीय आणि गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आगामी काळाता याचा काही परिणाम शेअर मार्केटवर पडू शकतो.