मुंबई- शेअर बाजाराच्या निर्देशांकाने प्रथमच ३९ हजार अंशाचा टप्पा ओलांडला आहे. निफ्टीनेही ११ हजार ७०० अंशाचा टप्पा ओलांडला आहे. चीन-अमेरिकेतील व्यापारी वादावर तोडगा निघत असल्याचा शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
शेअर बाजाराचा निर्देशांक हा सकाळी १० वाजून १५ मिनिटाला ३८, ९९३ अंशावर पोहोचला. तर १० वाजून २७ मिनिटाला ३९,०५.२६ अंशावर पोहोचला. मागील सत्राच्या तुलनेत शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३४२.३४ अंशाची वाढ झाली आहे.
३ स्पटेंबर २०१८ नंतर प्रथमच निफ्टीने ११ हजार ७०० अंशाचा टप्पा ओलांडला आहे. चीन आणि अमेरिकेमधील व्यापारी वादावर तोडगा निघत असल्याने आशियातील शेअर बाजारमध्ये सकारात्मक वातावरण आहे. तसेच मार्चदरम्यान चीनमध्ये वस्तुंचे उत्पादन वाढल्यानेही आशियातील शेअर बाजारात आशावादी स्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्यात अमेरिका आणि चीनने आयात शुल्क वादावर तोडगा निघत असल्याचे संकेत दिले होते. या आठवड्यात दोन्ही देशांमध्ये वॉशिंग्टनमध्ये बैठक पार पडणार आहे.