नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे निकाल गुरुवारी घोषित होणार आहेत. त्यापूर्वी बाजार नियंत्रक सेबीसह शेअर बाजारात देखरेख करण्यासाठी कडक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे . निवडणूक निकालाच्या तोंडावर शेअर बाजारात ढवळाढवळ करणाऱ्या नियमबाह्य कृत्यावर ही यंत्रणा नजर ठेवणार आहे.
एक्झिट पोल घोषित होताच शेअर बाजाराचे पहिले सत्र सोमवारी सुरू होण्यापूर्वी मॉनिटरिंग व्यवस्था सुरू होणार आहे. ही यंत्रणा निवडणूक निकाल लागण्यादिवशी म्हणजे गुरुवारीही सुरू राहणार आहे. निवडणुकीच्या निकालाचे शेअर बाजारावर मोठे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या यंत्रणेच्या माध्यमातून अस्थिर अशा शेअर बाजारातील नियमबाह्य हस्तक्षेपावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.