नवी दिल्ली- नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (एनएसई) तांत्रिक अडथळ्यामुळे चार तास व्यवहार ठप्प झाले होते. या प्रकाराची सेबीने माहिती मागविली आहे. सेबीने लवकरात लवकर अहवाल पाठविण्याचे एनएसईला निर्देश दिले आहेत.
तांत्रिक अडथळा आला असताना दुसऱ्या साईटवर माहिती का हलविण्यात आली नाही, याची कारणेही सेबीने एनएसईला विचारली आहेत. कोणत्या कारणांमुळे एनएसईमधील व्यवहार ठप्प झाले होते, यामागील सविस्तर कारणे शोधण्याचा सेबीने एनएसईला सल्ला दिला आहे. एनएसईने सकाळी ११ वाजून ४० मिनिटाला व्यवहार ठप्प झाल्याची माहिती दिली होती. टेलिकॉम सेवा पुरवठादार कंपन्यांकडून झालेल्या तांत्रिक अडथळ्यांमुळे व्यवहार ठप्प झाल्याचे एनएसईने म्हटले आहे. या परिस्थितीवर सेबीचे सातत्याने लक्ष होते. सेबीचे अधिकारी सातत्याने एनएसईच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते.