मुंबई- रुपयाची डॉलरच्या तुलनेत ६३ पैशांनी शुक्रवारी घसरण झाली आहे. या घसरणीनंतर रुपया ७२.२४ वर पोहोचला आहे. हे गेल्या सहा महिन्यातील सर्वाधिक अवमूल्यन आहे. तर आठवडाभरात रुपया डॉलरच्या तुलनेत ५६ पैशांनी घसरला आहे.
इंटरबँक फॉरेन एक्सचेंज मार्केट खुले होताना डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून ७१.९० वर पोहोचला होता. तर बाजार बंद होताना रुपया ७२.२४ वर स्थिरावला होता. ही गेल्या सहा महिन्यातील रुपयाची सर्वात मोठी घसरण आहे.
इमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य संशोधक राहुल गुप्ता म्हणाले, चीनमधून कोरोना जगभरात पसरत असल्याने बाजाराची चिंता वाढली आहे. तसेच जागतिक मंदी येण्याची शक्यता असल्याने जोखीम वाढली आहे. कोरोनाचा विविध व्यवसायांवर परिणाम होत आहे.