मुंबई - पेट्रोलियम उत्पादनांसह दूरसंचार क्षेत्रातील कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने गुरुवारी भांडवली मूल्यात नवा विक्रम केला. रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील पहिली १० लाख कोटी रुपयांचे भांडवली मूल्य असलेली कंपनी झाली आहे.
रिलायन्सच्या शेअरचे दर गुरुवारी हे गेल्या ५२ आठवड्यात सर्वात अधिक होते. रिलायन्सचे शेअर हे ०.६४ टक्क्यांनी वाढून प्रति शेअर हे १५८१.२५ रुपये झाले. रिलायन्सनंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, हिंदूस्थान लिव्हर या कंपन्या भांडवली मूल्यात आघाडीवर आहेत.
रिलायन्सने मार्च २०२० पर्यंत कर्जमुक्त होण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. यापूर्वीच रिलायन्सने तेलशुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल उद्योगातील २० टक्के हिस्सा सौदी अॅरेम्को कंपनीला विकण्याचे जाहीर केले आहे. रिलायन्सने जीओ प्लॅटफॉर्म्स लि. या डिजीटल माध्यमांची स्थापना करण्याचे नुकतेच जाहीर केले. या नव्या कंपनीत रिलायन्स १.०८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. फॅशन, लाईफस्टाईल आणि ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या व्यवसायात रिलायन्स ही इतर कंपन्यांहून वरचढ असल्याचे शेअर दलालाने सांगितले.