टेक डेस्क - भारतात तरुणाईमध्ये सध्या सर्वात प्रचंड लोकप्रिय जर कोणता गेम आहे तर तो आहेPUBG.या गेमवरुन काही महिन्यांपासून वादालाही तोंड फुटले आहे. अनेकदा या गेमला भारतात बॅन करण्यात यावे,अशी मागणी करण्यात येत आहे.
गुजरातच्या अनेक शहरात पबजी बॅन आहे. १० लोकांना बॅन असूनही खेळताना गुजरातमध्ये पोलिसांनी पकडले होते. तेव्हाTencent Games ने प्लेअर्सची बाजू घेतली होती. यासह म्हटले होते, की पबजी वर लागलेले बॅन हटवण्यासाठी ते पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करतील.
आता मिळालेल्या माहितीनुसार पबजीमध्ये एका नवीन फिचरची टेस्टिंग करण्यात येत आहे. याला हेल्थ रिमाईंडर असे संबोधण्यात येत आहे. सध्या या फिचरची टेस्टिंग भारतातील अनेक शहरांमध्ये होत आहे. हे फिचर आल्यानंतर युजरला ६ तासापेक्षा अधिक पबजी खेळता येणार नाही. ६ तास पूर्ण झाल्यानंतर पबजी प्लेअर्सला नोटिफिकेशन मिळणार आणि गेम बंद होणार.
अनेक गेमर्सनी यावर बोलताना सांगितले, की त्यांना सुरुवातीचे २ तास झाल्यानंतर एक मॅसेज अलर्ट येत आहे आणि ४ तासानंतर पुन्हा एक मॅसेज मिळतो आहे. या मॅसेजमध्ये तुम्हाला देण्यात आलेली वेळेची अवधि समाप्त होत असल्याचे फ्लॅश होत आहे.
दरम्यान ६ तास पूर्ण झाल्यानंतर गेम बंद होणार आणि २४ तासानंतर प्लेअर्सला गेम खेळण्यासाठी पुन्हा ६ तासांचा वेळ मिळणार. यासह रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे, की हा प्रतिबंध केवळ १८ वर्षांपेक्षा कमी असलेल्या मुलांसाठी आहे. मात्र सध्या कंपनीने यावर अधिकृतरित्या काही भाष्य केलेले नाही.