नवी दिल्ली - सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचे पेव सुटलं आहे. काही जणांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन चांगले पैसे मिळाले देखील आहेत. IPO च्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. 16,600 कोटी रुपयांचा आयपीओ सुरू करण्यासाठी पेटीएमला सेबीची मंजुरी मिळाली आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल. यापूर्वी 2010 मध्ये कोल इंडिया लिमिटेडने 15000 कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता.
इकॉनॉमिक टाइम्सच्या मते, कंपनी ऑफरचा आकार सुमारे 1,000 ते 2,000 कोटी रुपयांनी वाढवू शकते. म्हणजेच या IPO चा एकूण आकार 18,000 कोटी रुपये असू शकतो. ऑफर फॉर सेल अंतर्गत, पेटीएमचे विद्यमान गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स विकतील. कंपनी प्राथमिक बाजारात 8,300 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहे. उर्वरित 8,300 कोटी रुपयांचे समभाग ऑफर फॉर सेल (म्युच्युअल फंड आणि भागधारक कंपन्या) मध्ये विकले जातील.
जाणून घ्या शेअरची किंमत काय असेल?
चीनी उद्योगपती जॅक माच्या अँट ग्रुप व्यतिरिक्त, अलीबाबा सिंगापूर, एलिवेशन कॅपिटल, सॉफ्टबँक व्हिजन फंड आणि बीएच इंटरनॅशनल होल्डिंग्सने देखील पेटीएममध्ये गुंतवणूक केली आहे. अहवालानुसार, पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लिस्ट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पेटीएम 1.47-1.78 लाख कोटी रुपयांचे मूल्यांकन हवे आहे. अमेरिकास्थित मूल्यमापन तज्ञ अश्वथ दामोदरन यांनी कंपनीच्या सूचीबद्ध नसलेल्या शेअर्सचे मूल्य 2,950 रुपये प्रति शेअर केले आहे. IPO ची किंमत 3000 ते 3200 पर्यंत असू शकते. पेटीएमच्या आयपीओचे संचालन Morgan Stanley करू शकतात. आतापर्यंत याचा दावा Citigroup Inc. आणि JPMorgan Chase & Co. करत आहे.
पेटीएम नफा कमावू शकतो -
शेअर बाजारात आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांसाठी सध्या चांगले वातावरण असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. कोरोनानंतर, छोटे गुंतवणूकदार देखील चांगले गुंतवणूक पर्याय शोधत आहेत. ते प्राथमिक बाजारपेठेत रस घेत आहे. गेल्या वर्षाच्या नुकसानीनंतर पेटीएम 2021-22 मध्ये नफा कमावू शकतो. त्यामुळे खरेदीदारांचा कल त्याच्या आयपीओकडे असेल. आतापर्यंत, कंपनीकडून असे सांगितले गेले आहे, की ते नुकसान भरून काढण्यासाठी नव्हे तर व्यवसाय वाढवण्यासाठी आयपीओ आणत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. लक्षणीय म्हणजे, कोरोना काळात पेटीएमला 2020-21 मध्ये 4,783 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.