औरंगाबाद- कांद्याची बाजारातील आवक निम्म्याहून अधिक घटल्याने कांदा शंभरी गाठणार असल्याची शक्यता कांदा व्यापारी वर्तवत आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीला सर्वसामान्यांच्या आहारातील आणि चिवड्यासारख्या फराळातील कांदा गायब होण्याची चिन्हे दिसत आहेत.
परतीच्या पावसामुळे पिकांसह कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन काढणीला मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने कांदा जमिनीतच सडला. त्यामुळे बाजारात नवा कांदा आलाच नाही. आवक नसल्याने कांद्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत.
कांद्याचे दर शंभर ते दीडशे रुपये किलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता
शहरात जिल्ह्यातील आसपासच्या गावांमधून कांदा बाजारात येत होता. मात्र, गेल्या महिनाभरापासून स्थानिक कांद्याची बाजारातील आवक कमी झाली आहे. तीन आठवड्यांपूर्वी कांद्याचा दर 25 ते 30 रुपये प्रति किलो होता. जुना कांदा खराब होत असल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. स्थानिक कांदा कमी झाल्याने औरंगाबादचे व्यापारी नगर जिल्ह्यातून कांदा मागवित आहेत. त्यामुळे हा कांदा सर्वसामान्यांना प्रति किलो 90 रुपयांपर्यंत खरेदी करावा लागत आहे. येत्या काही दिवसात कांद्याचे दर शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.