महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

नाशिक: कांदा शंभरीच्या उंबरठ्यावर; भाव नियंत्रणात ठेवण्याची गृहिणींची मागणी - farmers on onion rate news

वाढलेली मागणी, आवक कमी आणि अतिवृष्टीने झालेले नुकसान या कारणांनी कांद्याचे भाव वाढले आहेत. गृहिणींमध्ये नाराजी तर शेतकऱ्यांमध्ये मागील नुकसानीची भरपाई झाल्याची भावना आहे.

कांदा बाजारपेठ
कांदा बाजारपेठ

By

Published : Oct 20, 2020, 4:41 PM IST

Updated : Oct 21, 2020, 6:22 PM IST

नाशिक- जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून कांद्याचे भाव सरासरी 7 हजार ते 7 हजार 500 रुपये क्विंटलपर्यन्त पोहचले आहेत. किरकोळ बाजारात ग्राहकांना 80 रुपये दराने कांदा खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी सर्वसामान्य गृहिणींनी केली आहे.

जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे उन्हाळी कांदा केवळ 15 ते 20 टक्के शिल्लक आहे. नाशिकच्या सर्वच बाजार समितीमध्ये कांद्याची मागणी वाढली आहे. प्रत्यक्षात बाजारसमितीमध्ये कांद्याची आवक कमी होत असल्याने भाव वाढले आहेत. जिल्ह्यात कळवण तालुक्यातील अभोना उप बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 9 हजार रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला आहे.

कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्याची गृहिणींची मागणी

गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. लाल कांदा बाजारात येण्यास अजून महिना लागणार असल्याने पुढील काही दिवसात उन्हाळी कांद्याच्या भावात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य ग्राहकांना कांदा 100 रुपयांहून अधिक दराने खरेदी करावा लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.



दक्षिणेकडे पाऊस झाल्याने लाल कांदा खराब-
आंध्रप्रदेश, कर्नाटक, हैदराबाद येथे मुसळधार पावसामुळे नवीन लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. लाल कांदा कमी टिकाऊ असल्याने ह्या कांद्याची तेथील स्थनिक बाजारातच विक्री करण्यात आली. यांचा परिणाम देशातील अन्य बाजार समितीवर झाला आहे.


कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्याची गृहिणींची मागणी-
दरवर्षी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्यात कांद्याचे भाव वाढत असतात. चार दिवसांपूर्वी 50 रुपये प्रति किलो असलेला कांदा आज 80 रुपये प्रति किलो दराने खरेदी करावा लागत आहे. आधीच टाळेबंदीच्या काळात आर्थिक गणित बिघडले आहे. त्यात भाज्यासोबत कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कांद्याशिवाय भाज्या करता येत नाहीत. बाजारात आल्यावर 2 किलो कांदा खरेदी करतो. मात्र, कांद्याचे भाव 80 रुपये झाल्याने एकच किलो कांदा खरेदी केल्याचे गृहिणींनी म्हटले आहे. सरकारने इतर वस्तूप्रमाणे कांद्याला 20 ते 25 रुपये किलो दर निश्चित करावा. तर हा कांदा आम्हालाही आणि शेतकऱ्यांनाही परवडेल, असे गृहिणींनी म्हटले आहे.

मागील नुकसानीची भरपाई झाल्याची शेतकऱ्यांची भावना-
लॉकडाऊन काळात हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद असल्याने कांद्याची मागणी कमी झाली होती. तेव्हा आम्ही कांदा 300 ते 500 क्विंटल दराने विकला. त्यात आमचा उत्पादन खर्चदेखील निघाला नव्हता. काही प्रमाणात कांदा चाळीत साठून ठेवला होता. मात्र तोदेखील पावसामुळे खराब झाला. त्यातील चांगल्या कांद्याला प्रति क्विंटल 7 हजार रुपये मिळाल्याने आनंद आहे. मात्र, ही मागील नुकसानीची भरपाई म्हणता येईल, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

80 टक्के कांदा व्यापाऱ्यांकडे?
जिल्ह्यात 15 ते 20 टक्के कांदा शिल्लक आहे. यामधील 80 टक्के कांदा हा व्यापाऱ्यांकडे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागील महिनाभपूर्वी काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून 2000 ते 2200 क्विंटल दराने कांदा खरेदी केला. त्याच कांद्याला 7 हजार ते 8 हजार रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे काही प्रस्थापित कांदा व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळणार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.





Last Updated : Oct 21, 2020, 6:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details