नवी दिल्ली - कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आयात केलेला कांदा देशात पोहोचला आहे. तरीही देशातील किरकोळ बाजारपेठेत कांद्याचा भाव शुक्रवारी प्रति किलो १५० रुपये राहिला आहे.
देशात आयात केलेला १ हजार १६० टन कांदा पोहोचला आहे. येत्या तीन ते चार दिवसात १० हजार ५६० टन कांदा देशात पोहोचेल, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तुर्की, इजिप्त आणि अफगाणिस्तानमधून पांढरा आणि लाल कांद्याची आयात झाली आहे. हा कांदा मुंबई बंदरावर उतरल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
कांद्याचे भाव चढेच; सरकारकडून आयात सुरुच - कांदा भाववाढ
देशात आयात केलेला १ हजार १६० टन कांदा पोहोचला आहे. येत्या तीन ते चार दिवसात १० हजार ५६० टन कांदा देशात पोहोचेल, असे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
असे आहेत कांद्याचे दर प्रति किलो (रुपयामध्ये)
- कोलकाता -१२०
- दिल्ली -१०२
- मुंबई -८०
- चेन्नई - ८०
ही माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिली आहे. देशातील बहुतांश इतर शहरात कांद्याचा दर प्रति किलो १०० रुपये राहिला आहे. इटानगरमध्ये कांद्याचा दर प्रति किलो १५० रुपये आहे.
सरकारी व्यापारी संस्था एमएमटीसीने ४९ हजार ५०० टन कांदे आयातीचे कंत्राट दिले आहे. हा कांदा पुढील महिन्यात देशात पोहोचणार आहे. लांबलेला पाऊस व अवकाळी पावसाने कर्नाटक व महाराष्ट्रासह कांदा उत्पादनात आघाडीवर असलेल्या राज्यांना फटका बसला आहे. त्यामुळे चालू वर्षाच्या खरीप हंगामात कांद्याचे उत्पादन २५ टक्क्यांनी घटले आहे.