नवी दिल्ली - टाटा पॉवरकडून सहाय्य मिळत असलेली मावळ डेअरी विस्तार करणार आहे. डेअरीचे दूध 'क्रेयो' या ब्रँडच्या नावाने पुण्यासह लोणावळा परिसरात विकले जाते. तर पुढील वर्षात 'क्रेयो' दूध मुंबईच्या बाजारपेठेत आणण्याचे नियोजन असल्याचे टाटा पॉवरने म्हटले आहे.
येत्या चार ते सहा महिन्यांत मावळ डेअरीकडून रोज १० हजार लिटर दुधाचे उत्पादन घेतले जाणार असल्याचे टाटा पॉवरने म्हटले आहे. क्रेयोची विक्री करणारी मावळ डेअर शेतकरी सेवा उत्पादक (एमडीएफएसपीसीएल) ही पुणे जिल्ह्यातील महिलांची दूध उत्पादक कंपनी आहे.
हेही वाचा-गुगलमध्ये सुंदर पिचाईंचे 'नवे युग'; दुप्पट वेतनासह कोट्यवधी रुपयांचे मिळणार शेअर
एमडीएफएसपीसीएलचे १ हजार २०० महिला सदस्य आहेत. सध्या, रोज ६,७५० लिटर दुधाचे उत्पादन घेतले जाते. ही क्षमता वाढवून रोज १० हजार लिटर दुधाचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट कंपनीने निश्चित केले आहे. या कंपनीच्या कामगारांना टाटा पॉवरकडून तांत्रिक सहाय्य दिले जाते.
हेही वाचा-केंद्र सरकारने थकविली ईसीएचएसची रक्कम; रुग्णालये थांबविणार विनारोकड सेवा
टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा म्हणाले, स्थानिक लोकांना स्वंयपूर्ण करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नाचा भाग म्हणजे मावळ डेअरी आहे. त्यामागे स्थानिक ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करणे, हा हेतू आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे संपूर्ण काम महिलांकडून चालविले जाते. तसेच प्रकल्पाचे महिलांकडून व्यवस्थापन करण्यात येते. उत्पादनाचे वैविध्यकरण करण्यासाठी पनीर, दही अशी उत्पादनेही मुंबईच्या बाजारपेठेत आणण्यात येणार असल्याचे टाटा पॉवरने म्हटले आहे.