मुंबई- निफ्टीसह मुंबई शेअर बाजाराने निर्देशांकाचा आजपर्यंतचा सर्वोच्च टप्पा ओलांडला आहे. बँकिंग, वित्तीय, स्थावर मालमत्ता आणि वाहन कंपन्यांचे शेअर वधारले. तसेच विदेशी गुंतवणूकदार संस्थांचा ओघ सुरू राहिल्याने शेअर बाजारात तेजी दिसून आली.
शेअर बाजार निर्देशांकाने आज ४४,६०१.६३ चा टप्पा गाठला. मुंबई शेअर बाजार दिवसाखेर ४४५.८७ अंशाने वधारून ४४.५२३.०२ वर स्थिरावला. एनएसई निफ्टीचा निर्देशांक १२८.७० अंशाने वधारून १३,०५५.१५ वर स्थिरावला.
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर-
अॅक्सिस बँकेचे सर्वाधिक ४ टक्क्यांनी शेअर वधारले. त्यापाठोपाठ एम अँड एम, एचडीएफसी बँक, आयटीसी, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, मारुती, कोटक बँक आणि सन फार्माचे शेअर वधारले. तर एचडीएफसी, टायटन, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, ओएनजीसी आणि इन्फोसिसचे शेअर घसरले. क्षेत्रनिहाय निर्देशांकामध्ये मुंबई शेअर बाजारात वित्तीय आणि वाहन कंपन्यांचे शेअर २.३७ टक्क्यांहून अधिक वधारले.
अशी आहे बाजारातील स्थिती-
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सोमवारी ४,७३८.४४ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. रुपयाचे मूल्य एका डॉलरच्या तुलनेत १० पैशांनी घसरून ७४.०१ रुपये झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.८५ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ४६.४५ डॉलर झाले आहेत.