जळगाव-आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी-विक्री करत आहेत. त्यामुळे स्थानिक बाजारात सोने आणि चांदीचे भाव अस्थिर आहेत. गुरुवारी जळगावात सोन्याचे भाव ४९ हजार ५०० (३ टक्के जीएसटी वगळून) आणि चांदीचे भाव ६३ हजार ५०० (३ टक्के जीएसटी वगळून) असे होते. ५८ हजार रुपये प्रतितोळ्यापर्यंत पोहोचलेले सोन्याचे भाव आता ५० हजारांच्या खाली आले आहेत.
सध्या,आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीची आवक सुरळीत आहे. त्याचप्रमाणे, सणासुदीनंतर मागणी कमी झाल्याने सोने व चांदीचे भाव कमी होत असल्याचे सुवर्ण व्यवसायिकांकडून सांगितले जात आहे. सोने व चांदीच्या भावात सतत होणाऱ्या चढ-उतारासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जळगाव शहर सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड म्हणाले की, सोने व चांदीचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीवर अवलंबून असतात. अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपया यातील फरकाचा सोने व चांदीच्या भावांवर थेट परिणाम होत असतो. सध्या अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपयात फारशी तफावत नाही. त्यामुळे सोने व चांदीचे दर अस्थिर आहेत, असे स्वरूप लुंकड यांनी सांगितले.
सोन्याची झळाळी पडतेय फिकी ही आहेत भाव अस्थिरतेची प्रमुख कारणे-
- आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी करत आहेत. त्यामुळे आपल्याकडे स्थानिक बाजारात सोने आणि चांदीचे भाव अस्थिर आहेत.
- सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता गुंतवणूकदार गुंतवणुकीतील सुरक्षितता आणि योग्य परतावा या दोन बाबींचा विचार करून सोने आणि चांदी खरेदी व विक्रीला प्राधान्य देत आहेत.
- आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी खरेदी-विक्रीवर सट्टा लावला जात आहे. त्यामुळे मौल्यवान धातूंचे भाव अस्थिर आहेत.
- दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय बाजाराचा कल बदलत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदारांनी सोने व चांदी विक्रीला पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतातील बाजारपेठेत सोने व चांदीचे भाव घसरण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या आठवडाभरापासून सोने-चांदीच्या भावामध्ये मोठी घसरण नोंदवली जात आहे.
यापुढे नेमकी परिस्थिती काय, हे अनिश्चितच-
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या खूप अस्थिरता आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सोने-चांदीची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे सोने-चांदीचे भाव घसरत आहेत. आता यापुढे नेमकी काय परिस्थिती राहील, हे अनिश्चितच आहे. मात्र, सोने अजून घसरण्याची शक्यता असली तरी सोन्याचे भाव हे यापुढच्या काळात ४७ हजार ते ५२ हजारांच्या दरम्यान राहू शकतात. चांदीच्या बाबतीतही हीच स्थिती असेल, असा अंदाज असल्याचेही स्वरूप लुंकड म्हणाले.
सोने व चांदीच्या भावात आधी वाढ, आता घसरण-
गेल्या पाच महिन्यांपासून सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ होत जाऊन सोने ५८ हजारांपर्यंत गेले होते. तसेच चांदीदेखील ७७ हजारांच्या पुढे गेली होती. मात्र, नंतर बाजारपेठ अनलॉक होत गेली तसतसे सोने-चांदीचे भाव कमी-कमी होत गेले. विशेष म्हणजे, विजयादशमी व धनत्रयोदशीलादेखील सोने-चांदीचे भाव आणखी कमी झाले होते. त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने व चांदीच्या भावात काहीशी वाढ नोंदवण्यात आली होती. मात्र, आता गेल्या आठवड्यापासून तर सोने-चांदीच्या भावात पुन्हा घसरण सुरूच आहे.
- अशी राहिली आहे आठवडाभरातील स्थिती-
- गेल्या आठवड्यात सोमवारी, २३ नोव्हेंबर रोजी ५१ हजार १०० रुपये प्रतितोळा असलेल्या सोन्याच्या भावात घसरण होत जाऊन २७ रोजी ते ४९ हजार ६०० रुपयांवर आले होते.
- त्यानंतर २८ रोजी पुन्हा ७०० रुपयांनी घसरण होऊन सोने ४८ हजार ९०० रुपयांवर आले.
- पुन्हा ३० नोव्हेंबर, सोमवारी २०० रुपयांची घसरण होऊन ते ४८ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते.
- अशाच प्रकारे २३ रोजी ६३ हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात घसरण होत जाऊन २७ रोजी ती ६० हजार ५०० रुपयांवर आली.
- त्यानंतर २८ रोजी पुन्हा ५०० रुपयांनी घसरण होऊन चांदी ६० हजार रुपये प्रति तोळ्यावर आली. ३० नोव्हेंबर, सोमवारी चांदीचे हेच भाव कायम होते.