मुंबई - सलग दुसऱ्या वर्षी देशातील रत्ने आणि दागिने उद्योग ऐन अक्षयतृतीयच्या दिवशी लॉकडाऊन अनुभवणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीच्या देशातील अनेक राज्यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे रत्ने आणि दागिने उद्योगाचे अक्षयतृतीयेला (१४ मे) होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीचे नुकसान होणार आहे. अक्षयतृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.
ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे (जीजेसी) अध्यक्ष आशिष पेठे म्हणाले, की देशातील ९० टक्के राज्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. त्यामुळे सोने दुकाने बंद राहणार आहेत. सोन्याचे दागिने आणि रत्नांची डिलिव्हरी करण्याला परवानगी नाही. त्यामुळे ही अक्षयतृतीयेला कोणताही व्यवसाय होणार नाही. गतवर्षी ऑनलाईन आणि टेलिफोनद्वारे बुकिंग झाली होती. मात्र, यंदा बिगर जीवनावश्यक असल्याने सोने खरेदीला मर्यादा आल्या आहेत. यंदा लग्नसराईत लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वीच सोने खरेदी करण्यात आली आहे. ही दिलासादायक बाब आहे.
हेही वाचा-केंद्रीय मंत्री म्हणतात, लस उत्पादन मोठ्या प्रमाणात होत नसेल तर आम्ही फाशी घ्यावी का?
लॉकडाऊनमुळे विशेष विक्री होण्याची शक्यता नाही-
ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशनचे (एआयजेजीएफ) राष्ट्रीय समनव्यक पंकज अरोरा म्हणाले, की गतवर्षी अक्षयतृतीयेला १० हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. गतवर्षी लॉकडाऊनमुळे केवळ ५०० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे विशेष विक्री होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.