मुंबई- माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांचे शेअर आज मुंबई शेअर बाजारात वधारले आहेत. अमेरिकेच्या न्यायालयाने एच-१बी व्हिसावरील बंदी उठविली आहे. व्हिसावरील बंदी उठविण्यात आल्याने भारतीय आयटी कंपन्यांना व्यवसायाचा विस्तार करता येणे शक्य होणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासाने कार्यकारी अधिकारांचा वापर करून एच-१बी व्हिसावर तात्पुरते निर्बंध लागू केले होते. त्यामध्ये विदेशातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या एच-२बी, जे आणि एल व्हिसा यांचाही समावेश होता.
ट्रम्प प्रशासानाने व्हिसा बंदी लागू केल्यानंतर अमेरिकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या आयटी व्यावसायिकांना मोठा धक्का बसला होता. तसेच देशातील आयटी कंपन्यांना अमेरिकत नवीन कर्मचारी नियुक्त करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या.
ट्रम्प यांनी त्यांच्या कायदेशीर अधिकारात वाढ करून व्हिसावर निर्बंध लागू केले होते. पण, हा बदल लोकहिताचा नसल्याचे न्यायाधीशांनी गेल्या आठवड्यात दिलेल्या निकालात म्हटले आहे. एस अँड पीमध्ये मुंबई शेअर बाजाराचा आयटी निर्देशांक हा ३.३० टक्क्यांनी वधारला.
अशी वाढली आयटी कंपन्यांच्या शेअरची किंमत
- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसचे शेअर हे ५.९५ टक्क्यांनी वधारून प्रति शेअर हे २ हजार ६७२.८० रुपये झाले.
- टीसीएसच्या संचालक मंडळाने शेअर बायबॅक घेण्यावर ७ ऑक्टोबरच्या बैठकीत विचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. या घोषणेमुळेही टीएसीएसच्या शेअरच्या किमतीत वाढ झाली आहे.
- विप्रोच्या शेअरची किंमत ५.६७ टक्के, इन्फोसिसच्या शेअरची किंमत २.४३ टक्के तर, एचसीएल टेक्नॉलॉजीसच्या शेअरची किंमत १.४० टक्क्याने वाढली आहे.