नवी दिल्ली-काही दिवस उच्चांकी निर्देशांक नोंदविल्यानंतर शेअर बाजारात घसरण सुरू आहे. गेल्या चार दिवसात शेअर बाजारात घसरण झाल्याने गुंतवणुकदारांनी ८ लाख कोटी रुपये गमाविले आहेत.
मुंबई शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रात आज घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज ९३७.६६ अंशाने घसरून ४७,४०९.९३ वर स्थिरावला. गेल्या चार सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक एकूण २,३८२.१९ अंशाने घसरला आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य हे ८,०७,०२५.०९ कोटी रुपयांवरून १,८९,६३,५४७.४८ कोटी रुपये झाले आहे.
हेही वाचा-'जीएसटी'तील किचकट तरतुदींविरोधात कर सल्लागारांचा शुक्रवारी देशव्यापी एल्गार
कोटक सिक्युरिटीजचे कार्यकारी उपाध्यक्ष रस्मीक ओझा म्हणाले की, सौद्यांची मुदत दोन दिवसाने संपत असताना शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी गुंतवणुकदारांनी सावधगिरी घेतली आहे. बहुतेक कंपन्यांची तिमाहीत कामगिरी घसरल्याचेही ओझा यांनी म्हटले आहे. अॅक्सिस बँक, टायटन, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, डॉ. रेड्डीज, एचडीएफसी आणि एशियन पेंट्सचे शेअर ४ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.