मुंबई- इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख आणि मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय यांनी अनैतिक पद्धतींचा अवलंब केल्याचा आरोप कंपनीच्या जागल्यांनी पत्रातून केला. त्याचा फटका बसल्याने इन्फोसिसचे शेअर १५ टक्क्यांनी घसरले आहेत.
इन्फोसिसच्या शेअरची शुक्रवारी मुंबई शेअर बाजार बंद होताना ७६७.७५ रुपये एवढी किंमत होती. यामध्ये सुमारे १५ टक्के घसरण होवून प्रति शेअरची किंमत ही ६४५.३५ रुपये झाली आहे.
जागल्यांनी काय आहे म्हटले आहे पत्रात-
इन्फोसिसमधील काही कर्मचारी यांनी जागल्यासारखे काम करत काही अनुचित प्रकार झाल्याचा आरोप पत्रातून केला. या पत्रात त्यांनी लेखापरीक्षक आणि संचालक मंडळाकडून महत्त्वाची माहिती दडविण्यात आल्याचा आरोप आहे. यामध्ये व्हेरिझॉन, इंटेल आणि संयुक्त भागीदारीचे प्रकल्प आणि एबीएन अॅम्रो ताब्यात घेणे आदींचा समावेश आहे. हे लेखापरीक्षणाच्या मानकानुसार प्रमाणित नसल्याचेही एका इन्फोसिसच्या माजी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. पारेख आणि रॉय यांनी अनेक तिमाहीत अनुचित प्रकार केल्याचा दावा काही अज्ञात इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांनी केला. याचे ई-मेल आणि ध्वनीमुद्रण असल्याचे कर्मचाऱ्यांनी पत्रातून म्हटले आहे.
दरम्यान, कंपनीच्या व्हिसलब्लोअर धोरणानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे इन्फोसिसने म्हटले आहे. इन्फोसिसचे चेअरमन नंदन निलकेणी यांनी पत्राबाबत स्वतंत्र चौकशी करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.