महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्याकरता केंद्र सरकारने 'हे' उचलले पाऊल

देशात अनेक ठिकाणी कांद्याचे दर प्रति किलो हे ७५ रुपयांहून अधिक आहेत. त्यामुळे नाफेडकडून देशातील किरकोळ व घाऊक बाजारपेठेत कांदा उपलब्ध केला जात आहे.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Oct 24, 2020, 4:22 PM IST

Updated : Oct 24, 2020, 4:37 PM IST

नवी दिल्ली -कांद्याचे दर वाढल्याने सामान्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कांद्याचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. केंद्र सरकार देशातील बाजारपेठेत नाफेडकडील २५ हजार टन कांद्याचा राखीव साठा (बफर स्टॉक) नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारात खुला करणार आहे.

नाफेड सहकारी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार चढ्ढा म्हणाले, की देशातील बाजारपेठेत कांद्याचा मुबलक पुरवठा होण्यासाठी नाफेडकडून कांद्याचा राखीव साठा बाजारात उपलब्ध करण्यात येणार आहे. देशात अनेक ठिकाणी कांद्याचे दर प्रति किलो हे ७५ रुपयांहून अधिक आहेत. त्यामुळे नाफेडकडून देशातील किरकोळ व घाऊक बाजारपेठेत कांदा उपलब्ध केला जात आहे. हा कांदा राज्यांना वाहतुकीचा खर्च वगळता २६ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध करून दिला जात असल्याचे चढ्ढा यांनी सांगितले. नाफेडने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये कांद्याचा राखीव साठा केला आहे.राखीव साठ्यातील खराब झालेल्या ४३ हजार टन कांद्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात २५ हजार टन कांदा बाजारात उपलब्ध होणार आहे.

कशामुळे सरकार ठेवते कांद्याचा राखीव साठा?

कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून कांद्याचा राखीव साठा ठेवण्यात येतो. चालू वर्षात नाफेडने १ लाख टनांहून अधिक कांदा राखीव साठ्यासाठी खरेदी केला आहे. हा कांदा बाजारात उपलब्ध केला जात आहे.

यामुळे देशात वाढले कांद्याचे दर

कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या महाराष्ट्र व कर्नाटकला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाल्याने बाजारपेठेत नव्या कांद्याची आवक कमी झाली आहे. अशा परिस्थितीमुळे कांद्याचे दर पुण्यासह काही जिल्ह्यांत प्रति किलो १०० रुपयापर्यंत पोहोचले आहेत.

Last Updated : Oct 24, 2020, 4:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details