नवी दिल्ली - केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध हटविण्यावर विचार करत आहे. सध्या, बाजारात नव्या मालाची आवक असल्याने कांद्याची किंमत कमी होत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
बाजारात नव्या कांद्याची आवक होत असल्याने किमती आणखी कमी होणार आहेत. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवरील बंधन काढण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. कांद्याच्या किमती बाजारात गुणवत्तेप्रमाणे प्रति किलो ६० ते ७० रुपयादरम्यान आहेत. गेल्या महिन्यात कांद्याच्या किमती प्रति किलो १६० रुपयापर्यंत पोहोचल्या होत्या. जानेवारी ते मे दरम्यान बाजारात नवा कांदा उपलब्ध होणार आहे.
केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सप्टेंबर २०१९ मध्ये कांदा निर्यातीवर निर्बंध लागू केले होते. तसेच घाऊक व किरकोळ विक्रेत्यांच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा घालून दिली होती. दिल्लीसह देशातील सर्व शहरांच्या किरकोळ बाजारपेठेत कांद्याच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या होत्या.