जळगाव- कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून सुवर्ण बाजारावर मंदीचे सावट होते. मात्र, ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडल्याने सुवर्ण बाजारात चैतन्य संचारल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या काळात धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोने व चांदी खरेदी शुभ मानली जाते. या दोन्ही मुहूर्तांच्या पार्श्वभूमीवर जळगावात सोने व चांदी खरेदीसाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये मोठी गर्दी होत आहे.
प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीमुळे सुवर्ण बाजारात आशेचा किरण निर्माण झाला आहे. यावर्षी दिवाळीसाठी कोरियन व टर्की ज्वेलरी बाजारात दाखल झाली आहे. या दागिन्यांना ग्राहकांची चांगली पसंती आहे.
सुवर्ण बाजारात वाढली उलाढाल सुवर्ण बाजारात वाढली उलाढाल
जळगाव येथील सुवर्ण बाजार हा देशभरात प्रसिद्ध आहे. कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर केल्यानंतर सर्वच क्षेत्रात उलाढाल ठप्प झाली होती. कोरोनाचा संसर्ग ओसरू लागल्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून हळूहळू टाळेबंदी खुली होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. तेव्हापासून सर्वच क्षेत्रात व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत. जळगावच्या सुवर्ण बाजारातही व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. या बाजारपेठेत उलाढाल वाढत आहे. दसरा, दिवाळी आणि पुढे येणारी लग्नसराईचा काळ सुवर्ण व्यावसायिकांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. दसऱ्यापासून सुवर्ण बाजारात उलाढाल वाढत आहे. दिवाळीच्या काळात सुवर्ण बाजारातील व्यवहार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुवर्ण व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या दागिन्यांची आली आहे 'सिरीज'
दिवाळीसाठी जळगावच्या सुवर्ण बाजारात पारंपरिक दागिन्यांसोबतच कोरियन, टर्की, कास्टिंग ज्वेलरीची नवीन सिरीज आली आहे. या विदेशी दागिन्यांसोबतच राजस्थानी दागिन्यांचीही नवीन सिरीज बाजारात आली आहे. हे सर्व दागिने विविध प्रकारच्या आकारात तसेच रंगसंगतीत उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, सोन्याचे दर अस्थिर असल्याने सर्वच दागिने हे कमी वजनाच्या प्रकारात वेगवेगळ्या किमतीत उपलब्ध आहेत. ग्राहकांची पसंती तसेच बजेटनुसार दागिने उपलब्ध करून देण्यावर सुवर्ण व्यावसायिकांचा भर आहे. प्रत्येक दागिना हा 5 ग्रॅमपासून ते 5 तोळ्याच्या वजनापर्यंत उपलब्ध आहे. याशिवाय ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार दागिने बनवून दिले जात आहेत. याशिवाय 24 आणि 80 कॅरेटचे दागिने व हिऱ्याचे दागिनेदेखील उपलब्ध आहेत. सोन्याचे दर चढे असल्याने ज्यांना सोने खरेदी शक्य नाही, अशा लोकांसाठी चांदीचे आकर्षक दागिने उपलब्ध आहेत. चांदीच्या कमी वजनाच्या दागिन्यांना मोठी मागणी असल्याची माहिती जळगाव शहर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष तथा महावीर ज्वेलर्सचे संचालक अजय ललवाणी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
असे आहेत आजचे दर-
सोने आणि चांदीचे दर पहिल्यांदाच दिवाळीच्या काळात धनत्रयोदशी तसेच लक्ष्मीपूजनाच्या तोंडावर घसरले आहेत. एरवी याच काळात सोने व चांदीचे दर वाढत असल्याचा पूर्वानुभव आहे. मात्र, जळगावात आज (गुरुवारी) सोने 51 हजार 200 रुपये प्रतितोळा (3 टक्के जीएसटी वगळून) तर चांदीचे दर 64 हजार 500 रुपये प्रतिकिलो (3 टक्के जीएसटी वगळून) असे आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमधून सोने-चांदी वगळावे-
जागतिक स्तरावरील बाजारात होणाऱ्या घडामोडींमुळे भारतात सोने व चांदीच्या दरांवर परिणाम होतो. त्यात सर्वाधिक परिणाम हा मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये असलेल्या अस्थिरतेमुळे होत असतो. यासंदर्भात बोलताना अजय ललवाणी यांनी सांगितले की, मल्टी कमोडिटी एक्सचेंज हा एक प्रकारचा सट्टा आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने, चांदी आणि प्लॅटिनम हे मौल्यवान धातू म्हणून समाविष्ट आहेत. त्यामुळे 'एमसीएक्स' अर्थातच मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सतत या धातूंच्या दरांमध्ये अस्थिरता असते. याचा फटका सुवर्ण व्यावसायिकांसह ग्राहकांना बसतो. केंद्र सरकारने मल्टी कमोडिटी एक्सचेंजमधून सोने, चांदी तसेच प्लॅटिनम वगळावेत, अशी आमची मागणी आहे. याशिवाय भारतात सोने व चांदीवर साडेबारा टक्के आयात शुल्क आकारले जाते. त्यावर पुन्हा तीन टक्के जीएसटी कर आकारला जातो. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत सोने व चांदी 15 टक्के महाग असते. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमधून सोने व चांदी हे धातू वगळले तर त्यांच्या दरांमध्ये काहीशी स्थिरता येईल, असेही अजय ललवाणी यांनी सांगितले.