नवी दिल्ली- सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा (१० ग्रॅम) २७८ रुपयांनी वाढून ४६,०१३ रुपये आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्याने देशातील बाजारपेठेतही बदल झाला आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४५,७३५ रुपये होता.
सोन्यापाठोपाठ चांदीचे दर २६५ रुपयांनी वाढून ६८,५८७ रुपये किलो आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६८,३२२ रुपये होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले की, दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा २७८ रुपयांनी वाढले आहेत. रुपया डॉलरच्या तुलनेत वधारूनही सोन्याचे दर वाढले आहेत. रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत १६ पैशांनी वधारून एका डॉलरसाठी ७२.४९ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरून प्रति औंस १,७७४ डॉलर आहेत. तर चांदीचा दर प्रति औंस २६.९४ डॉलर आहे.