नवी दिल्ली- जगभरात दहशत माजवलेल्या कोरोनाचा भारतीय शेअर बाजारावरही दुष्परिणाम दिसून येत आहे. मार्च महिन्यात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 1 लाख 18 हजार 184 कोटी रुपये काढून घेतले आहेत. कोरोनाला जागतिक आरोग्य संघटनेने महामारी म्हणून घोषित केल्यानंतर गुंतवणूकदारांनी पैसा काढून घेण्यास सुरुवात केली.
आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात 61 हजार 973 कोटी रुपयांची इक्विटी आणि 56 हजार 211 कोटी रुपयांचे बाँड असे एकूण 1 लाख 18 हजार 184 कोटी रुपये बाजारातून काढून घेण्यात आले. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजारातून पैसा काढून घेतल्याची नोंद नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीमध्ये झाली आहे. तर एप्रिल महिन्यातील केवळ दोन सत्रांमध्ये एकूण 6735 कोटी रुपये काढून घेण्यात आले आहेत. त्यामध्ये 3802 कोटी इक्विटी आणि 2933 कोटी कर्ज रक्कम काढली आहे.