मुंबई - जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने भारतीय भांडवली बाजारात चिंतेचे सावट पसरले आहे. याचा परिणाम म्हणून आज मुंबई शेअर बाजार निर्देशांकांची ६४२.२२ अंशाने पडझड झाली. शेअर बाजार दिवसाखेर ३६,४८१.०९ वर बंद झाला.
शेअर बाजारानंतर निफ्टीच्या निर्देशांकातही १८५.९० अंशाची घसरण झाली. निफ्टीमध्ये सर्वात अधिक ऑटोमोबाईल कंपन्यांच्या शेअरची घसरण झाली. निफ्टीचा ऑटो निर्देशांक दुपारनंतर ३ टक्क्यांनी घसरला.
ब्रेंटमध्ये कच्च्या तेलाच्या बॅरलचा दर प्रतिबॅरल हा ६८ डॉलर होता. तर शुक्रवारी प्रतिबॅरलचा दर हा ६० डॉलर होता. सौदी अरेबियातील तेल प्रकल्पावर येमेनच्या बंडखोरांनी ड्रोन हल्ला केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. तसेच सौदीच्या तेल उत्पादनात एकूण ५० टकक्यांची कपात झाली आहे.
सौदीच्या प्रकल्पामधील कामावर परिणाम झाल्याने येणाऱ्या काही दिवसात कच्च्या तेलाचे दर चढेच राहतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.