शांघाय- महासत्ता असलेल्या अमेरिकेबरोबर व्यापारी युद्ध करणे चीनला चांगलेच महागात पडले आहे. गेल्या ११ वर्षात चीनचे चलन असलेल्या युआनचा दर हा डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. युआनचा डॉलरच्या तुलनेत ७.१४८७ एवढा दर आहे. हा २००८ पासून सर्वात कमी दर आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेबरोबर असलेल्या चीनचे व्यापारी युद्ध आणखी भडकले आहे. चीनने अमेरिकेच्या उत्पादन शुल्कावर वाढीव आयात शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर अमेरिकेने पलटवार करत चीनच्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला.
चीनमध्ये युआन हे मुक्तपणे दुसऱ्या चलनात बदला येत नाही. चीन सरकारने युआनचे डॉलरसोबत विनिमय करताना काही मर्यादा आखल्या आहेत. ही मर्यादा चीनचे मध्यवर्ती बँक बाजारामधील ट्रेण्ड पाहून निश्चित करते. द पीपल्स बँक ऑफ चायनाने युआनचा दर हा डॉलरपेक्षा कमी करून ७.५७ एवढा केला होता.
युआन दर घसरल्याने चिनी निर्यातदारांना त्याचा फायदा होणे चीन सरकारला अपेक्षित आहे. त्यामुळे अमेरिकेने वाढीव आयात शुल्क लागू केले असताना त्याचा कमी परिमाण होईल, असे चीन सरकारला वाटते. अमेरिकेने चीनच्या उत्पादित मालावर वाढीव आयात शुल्क १ सप्टेंबरपासून लागू करण्याची घोषणा केली. त्यानंतर काही दिवसातच डॉलरच्या तुलनेत घसरण होवून युआन ७.० वर पोहोचला होता. त्यावेळी अमेरिकेने चीन सरकार हे चलनाचे नियमभंग (करन्सी मॅनिप्युलेटर) करत असल्याची टीका केली होती. त्यानंतर चीनच्या मध्यवर्ती बँकेने अमेरिकेचे आरोप फेटाळून लावले होते.