नवी दिल्ली - ऑक्टोबरमध्ये दिवाळी व दसरा असे सण असल्याने वाहन विक्री होईल, अशी वाहन उद्योगाला अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षा फोल ठरल्याचे दाखवून देणारी आकडेवारी समोर आली आहे. बजाज ऑटोच्या मोटारसायकल विक्रीत ऑक्टोबरमध्ये १४ टक्के घसरण झाली आहे.
पुण्यामध्ये असलेल्या बजाज कंपनीने भारतीय बाजारपेठेत ऑक्टोबरमध्ये २ लाख ४२ हजार ५१६ वाहनांची विक्री केली आहे. याच कालावधीत गतवर्षी २ लाख ८१ हजार ५८२ मोटारसायकलींची विक्री केली होती. विदेशातील बाजारपेठेकडून बजाज ऑटोला किंचित दिलासा मिळाला आहे. चालू वर्षात ऑक्टोबरमध्ये गतवर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत ३ टक्के अधिक मोटारसायकलची निर्यात झाली आहे.