मुंबई- ऐन लग्नसराईत कोरोनामुळे टाळेबंदी असल्याने सराफांचे मोठे नुकसान झाले आहे. असे नुकसान टाळण्यासाठी सराफांनी साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेला (२६ एप्रिल) ऑनलाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
अक्षय तृतीयेला मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होते. मात्र, टाळेबंदीने होणारे नुकसान टाळण्याकरता व्यापाऱ्यांनी ऑनलाईन विक्रीची शक्कल लढवल्याचे सोने-चांदीच्या व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी सांगितले. अक्षय तृतीयेला सोने खरेदी ही समृद्धीचे प्रतिक मानले जाते. अनेक ग्राहक सोन्याच्या खरेदीसाठी विचारणा करत आहेत. त्यामुळे काही सराफांनी ऑनलाईन पद्धत सुरू केल्याचे जैन यांनी ई टीव्ही भारतला सांगितले.
अक्षय तृतीयेला सोन्याचे दागिने खरेदी करण्याची महिलांची पसंती असते. यंदा मात्र, अक्षय तृतीयेला सोन्याच्या नाण्यांना अधिक पसंती दिली जाईल असा विश्वास जैन यांनी व्यक्त केला. मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होणार नसली तरी १० ते १२ टक्के सोने खरेदी होईल, असेही त्यांनी सांगितले.