वॉशिंग्टन - जागतिक महासत्ता असलेल्या चीन व अमेरिकेमध्ये व्यापारी युद्ध सुरू असल्याने जगभरामधील गुंतवणूकदार चिंतेत आहेत. अशा स्थितीमध्ये आणखी चिंता वाढविणारी बाब समोर आली आहे. अमेरिकेला येत्या दोन-तीन वर्षात मंदी विळखा घालणार असल्याचा अंदाज अमेरिकेतील अर्थतज्ज्ञांनी वर्तविला आहे.
नॅशनल असोसिएशन फॉर बिझनेस इकॉनिमिस्ट्सने (एनएबीई) या संस्थेने अर्थतज्ज्ञांची मते सर्व्हेमधून जाणून घेतली आहेत. यामध्ये काही अर्थतज्ज्ञांनी चालू वर्षात मंदी सुरू होईल, असे मत व्यक्त केले आहे. तर बहुतांश अर्थतज्ज्ञांनी २०२१ ला मंदी येईल, असे म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने अमेरिकेच्या फेडरेल बँकेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रम्प हे फेडरल बँकेवर टीका करत आहे. त्यामुळे बँकेवर असलेल्या लोकांच्या विश्वासहर्तेवर परिणाम होईल, असे काही तज्ज्ञांना वाटते. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी फेडरेल बँकेने रेपो दरात कपात करावी, अशी ट्रम्प यांनी जुलैमध्ये अपेक्षा केली होती.
चालू वर्षात अमेरिकेचा विकासदर कमी होईल, असा अंदाज ३८ टक्के अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तर ३४ टक्के अर्थतज्ज्ञांनी विकासदर कमी होणार नाही, असा अंदाज व्यक्त केला.
करात कपात केल्याने गेल्या १८ महिन्यात घरांशी संबंधित व्यवसायावर परिणाम झाल्याचे सर्व्हेतून दिसून आले आहे.