नवी दिल्ली - 'एक राष्ट्र, एक रेशन कार्ड'च्या अंतर्गत देशभरात आता एकच रेशनकार्ड असणार आहे. या योजनेमुळे नागरिकांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे रेशन कार्ड घ्यावे लागणार नाही. रेशन कार्ड धारकांना एकाच कार्डवर देशभरात कुठेही असताना लाभ घेता येणार आहेत. स्थलांतरित होणारे मजूर आणि रोजंदारी करणाऱ्या मजुरांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
'एक राष्ट्र, एक रेशन कार्ड' योजनाचे अंतर्गत देशातील 32 राज्यांच्या लोकांना फायदा होणार आहे. ही योजना देशातील 9 राज्यात यापूर्वीच लागू केली आहे. आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, हरयाणा, कर्नाटक, केरळ, तेलंगाणा, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश या राज्यात ही योजना लागू आहे. आता संपूर्ण देशात ही योजना लागू करण्यात येणार आहे. योजनेत अडचण आल्यास सरकारकडून टोल फ्री नंबर 14445 जारी करण्यात आला आहे.
एक देश, एक रेशनकार्ड योजना लागू झाल्यानंतर रेशनकार्ड धारक राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांर्तगत देशातील पीडीएस (पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टम) धारकांना राज्यातील कोणत्याही रेशन दुकानातून धान्य खरेदी करता येणार आहे. बनावट रेशन कार्ड ओळखण्यासाठी रेशन दुकांनामध्ये इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल (ईपीओएस) बसविण्यात आले आहेत. केंद्रात भाजप सत्तेत आल्यानंतर वन नेशन, वन इलेक्शन राबवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले होते. परंतु, सत्ताधारी भाजपच्या या मोहिमेला काँग्रेससह विरोधकांनी विरोध दर्शवला होता.