तिरुवनंतपुरम -माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वाढत्या बेरोजगारीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. मोदी सरकारने २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर अंसघटित क्षेत्रात गोंधळाची स्थिती असल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. ते राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीजच्या परिषदेमध्ये बोलत होते.
केंद्र सरकार नियमितपणे राज्य सरकारांशी चर्चा करत नसल्यानेही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी टीका केली आहे. संघराज्य व्यवस्थेत राज्यांशी नियमित चर्चा करणे हा भारतीय आर्थिक आणि राजकीय तत्वज्ञानाचा मुख्य कणा आहे. मात्र, सध्याचे केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग म्हणाले की, केरळसह इतर अनेक राज्यांची आर्थिक स्थिती विस्कटलेली आहे. राज्ये अतिरिक्त कर्ज घेत आहेत. त्यामुळे भविष्यात राज्यांच्या बजेटवर मोठा ताण निर्माण होणार आहे.
हेही वाचा-पश्चिम बंगाल, केरळ, पुदुचेरी, तमिळनाडू, आसाम येथील मतमोजणी २ मे रोजी