मुंबई- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकूण सुमारे २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे वित्तीय तूट १.५० लाख वाढेल, असे बार्कलेजच्या अहवालात म्हटले आहे. ही वित्तीय तूट एकूण जीडीपीच्या ०.७५ टक्के असेल, असेही अहवालात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जीडीपीच्या १० टक्के म्हणजे २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. त्यानंतर सलग पाच दिवस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पॅकेजचे टप्पे जाहीर केले आहेत.
हेही वाचा-कोरोनाचे संकट : १३.५ कोटी नोकऱ्यांवर संक्रात; १२ कोटी जण गरिबीत ढकलले जाणार
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये अर्थसंकल्पात जास्तीत जास्त ३.५ टक्के वित्तीय तूट गृहित धरली होती. आर्थिक पॅकेजच्या घोषणेनंतर केंद्र सरकार वित्तीय तूट ६ टक्क्यापर्यंत ठेवू शकेल, असे बार्कलेज इंडियाचे प्रमुख अर्थतज्ज्ञ राहुल बजोरिया यांनी सांगितले. आर्थिक पॅकेजच्या पाचव्या टप्प्यात मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे वित्तीय तुटीत वाढ होणार असल्याचेही बजोरिया यांनी सांगितले.
हेही वाचा-केंद्र सरकारकडे राज्यांचा चार महिन्यांचा जीएसटी मोबदला थकित