नवी दिल्ली - सार्वजनिक टीका रोखल्याने धोरणात चूक होते, असा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सरकारला दिला. यंत्रणेतील लोकांनी टीका सहन करायला पाहिजे, असेही त्यांनी नाव न घेता मोदी सरकारला टोला लगावला.
रघुराम राजन यांनी ब्लॉगमध्ये पोस्ट लिहून अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर निशाणा साधला. ते सध्या शिकागो विद्यापीठात वित्त विभागाचे प्राध्यापक आहेत.
रघुराम राजन यांनी काय म्हटले आहे ब्लॉगमध्ये
सरकारला धोरणात योग्य अशी सुधारणा करण्यासाठी केवळ टीका प्रोत्साहित करू शकते. जर प्रत्येक टीकेवर सरकारी यंत्रणेतून फोन येत असेल अथवा सत्ताधारी पक्षाच्या ट्रोल आर्मीकडून लक्ष्य होत असेल तर अनेकजण टीका कमी करतील. सरकार हे सुखद वातावरणात राहिल. कटू सत्य समोर येईल तेव्हा ते नाकारणे शक्य होईल, असा त्यांनी इशारा दिला. मागील नोकरीच्या काळात वैयक्तिक हल्ल्याचा अनुभव आल्याचे त्यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.