नवी दिल्ली - कोरोना चाचणीकरता देशात पाठविलेले किट हे सदोष निघाल्याने देशात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेला स्वदेशी जागरण मंच (एसजेएम) रविवारपासून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करणार आहे.
स्वदेशी जागरण मंचाने आजवर नेहमीच चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची भूमिका जाहीर केली आहे. मात्र, सध्याची स्थिती काहीशी वेगळी आहे. कोरोनाच्या धोक्याची चीनने जगाला वेळीच माहिती न दिल्याचा जगभरातील देश आरोप करत आहेत.
हेही वाचा-खनिज तेलाचे दर घसरूनही पेट्रोल-डिझेलचे दर ४० दिवसांपासून स्थिर
स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय समन्वयक अश्वनी महाजन म्हणाले, की मंचाचे समर्थक आणि स्वदेशीचे कार्यकर्ते हे आज स्वदेशी संकल्प दिवस पाळणार आहेत. ते घरात सायंकाळी साडेसहा वाजता दिवे पेटविणार आहेत. सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटाला चीनच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यासाठी शक्य ती पावले उचलणार असल्याची शपथ घेणार आहेत. कोरोनाच्या संकटामुळे सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम झाल्याने आपल्या अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहे. देशभरातील अर्थव्यवस्थांचे नुकसान झाले आहे. टाळेबंदीत आणि टाळेबंदीनंतरही भारत चीना मालांवरील बहिष्काराची प्रतिज्ञा पाळणार आहे.
हेही वाचा-टाळेबंदीत केशकर्तनालय व दारूची दुकाने बंदच राहणार; 'हे' आहे कारण
देशातील उद्योगांना प्रोत्साहन देणार आहोत. भारतीय उत्पादने विकत घेत चिनी मालावर बहिष्कार टाकावा. यामधून देशाचे वैभव परत आणावे, असे स्वदेशी जागरण मंचाने म्हटले आहे. चीनी उत्पादनांमुळे लघू आणि मध्यम उद्योग उद्धवस्त होत असल्याचेही मंचाने म्हटले आहे.