नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारीअखेर देशात येणार आहेत. या भेटीदरम्यान अमेरिका व भारतामध्ये लघू व्यापार करार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या स्वदेशी जागरण मंचाचे (एसजेएम) राष्ट्रीय समनव्यक अश्वनी महाजन यांनी अमेरिकेला आयात शुल्कात सवलत देण्यास विरोध केला आहे.
स्वदेशी जागरण मंचाने धार्मिक भावना दुखाविणाऱ्या अमेरिकेच्या उत्पादनांना बाजारपेठेत अनुमती देण्याला विरोध केला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम करणाऱ्या अमेरिकेच्या उत्पादनांनाही विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. अमेरिकेच्या दुग्धोत्पादन आणि कुक्कुटपालन क्षेत्राला भारत बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याचे काही माध्यमात वृत्त आले. त्यावर एसजेएमचे राष्ट्रीय समन्वयक अश्वनी महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हा लोकांच्या उदरनिर्वाहाचा अथवा धार्मिक मुद्दा अथवा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्याला पाठिंबा देणे शक्य नाही.
हेही वाचा-कोरोनाच्या भीतीचे सावट; स्पेनमधील 'मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०२०' रद्द
काही उत्पादनांवरील (हार्ले डेव्हिडसन दुचाकी) आयात शुल्क कमी करण्याला विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, बहुतांश लोकसंख्येवर परिणाम होणाऱ्या निर्णयाला प्रोत्साहन देवू शकत नाही. शेतकरी व दुग्धोत्पादनसारख्या क्षेत्रासाठी आरसीईपी हा करार योग्य नसल्याचे गतवर्षी स्वदेशी जागरण मंच व शेतकरी संघटनांनी भूमिका घेतली होती. या विरोधामुळे भारताने आरसीईपी करारामधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता.