नवी दिल्ली- आर्थिक संकटात सापडलेल्या भारत संचार निगमला (बीएसएनएल) सरकार पॅकेज देण्याची शक्यता आहे. याबाबतचे नियोजन सरकारकडे विचाराधीन असल्याचे बीएसएनएलने म्हटले आहे.
सरकारच्या नियोजनात बीएसएनएल कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना (व्हीआरएस) आणि ४ जी स्पेक्ट्रम तसेच मालमत्तेमधून कमाई करणे अशा पर्यायांचा समावेश आहे. त्यासाठी सरकार योग्य असे पॅकेज देणार असल्याचे बीएसएनएलने म्हटले आहे. नैसर्गिक आपत्तीसारख्या कठीण काळात देशासाठी बीएसएनएलने नागरिकांना सेवा दिली आहे. तसेच दुर्गम भागातही बीएसएनएलकडून सेवा देण्यात येते. भविष्यातही आम्ही सेवा देत राहू, असे कंपनीने म्हटले आहे. आर्थिक संकटात असलेले बीएसएनएल आणि एमटीएनएलला कर्मचाऱ्यांच्या पगारी करतानाही काही महिन्यांपूर्वी अडचणींना सामोरे जावे लागले.
बीएसएनएलला आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये अंदाजित सुमारे १४ हजार कोटींचा तोटा झाला आहे. तर १९ हजार ३०८ कोटींच्या महसुलात घट झाली आहे. कंपनीध्ये सुमारे १ लाख ६५ हजार १७९ कर्मचारी आहेत.