नवी दिल्ली- देशातील मंदीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले आहे. नियमनातील अस्थिरता हे देशाच्या आर्थिक मंदीचे एक कारण असल्याचे गीता यांनी म्हटले. त्या 'फिक्की'च्या वार्षिक कार्यक्रमात बोलत होत्या.
मूळ भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ म्हणाल्या, अर्थव्यवस्थेसाठी सुधारणा महत्त्वाच्या आहेत. मात्र, धोरण आणि नियमनात स्पष्टता आणि निश्चितता असणे आवश्यक आहे. नियमनातील अस्थिरता ही मंदीला ठरलेले एक कारण आहे, असे मला वाटते. हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. सुधारणामध्ये सुस्पष्टता आणि चांगली निश्चितता असेल तर सुधारणांना मदत होऊ शकते, असे मत गोपीनाथ यांनी व्यक्त केले. नियमन विशेषत: धोरण कसे आहे आणि तुमच्यावर काय परिणाम करते, हे महत्त्वाचे असते. त्यामध्ये स्पष्टता असणे आवश्यक आहे.
हेही वाचा -वित्तीय आकडेवारीबाबत भारताने पारदर्शी रहायला पाहिजे - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
जीएसटीतही स्पष्टता आणि निश्चितता हवी -
वस्तू आणि कर (जीएसटी) साम्राज्य ही देशातील सर्वात मोठी कर सुधारणा म्हणण्यात आले आहे. कर दरातही स्पष्टता आणि निश्चितता आणणे आवश्यक आहे. जीएसटी ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नियम काय आहेत, कराचे दर काय असणार आहेत, यामध्ये निश्चितता असणे आवश्यक आहे.
संबंधित बातमी वाचा-आयएमएफ भारताच्या विकासदराचा अंदाज आणखी घटविणार; गीता गोपीनाथ यांचा इशारा
देशाच्या जीडीपीत घट-
तिसऱ्या तिमाहीत काही उच्च वारंवारता सूचकांकामधून (हाय फ्रेक्वन्सी इंडिकेटर्स) भारताचा विकासदर वाढत नसल्याचे दिसत आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मधील दोन्ही तिमाहीत विकासदर कमी होईल, असा अंदाज होता. त्यानंतर तिसऱ्या व चौथ्या तिमाहीत विकासदर वाढेल, असा अंदाज होता. मात्र, तिसऱ्या तिमाहीत तशी वाढ दिसत नाही. त्यामुळे यापूर्वी आकेडवारीचे पुनरावलोकन करण्यात येणार असल्याचे म्हटले होते.
देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा अंदाजित विकासदर (जीडीपी) आणखी कमी होणारी आकडेवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) जानेवारीमध्ये जाहीर करण्याची शक्यता आहे. याबाबतचे वक्तव्य गीता यांनी नुकतेच मुंबईमधील 'इंडिया इकॉनिमिक कॉनक्लेव्ह' कार्यक्रमात केले होते.