नाशिक- वाहन उद्योग हा मंदीच्या फेऱ्यात अडकल्याने जिल्ह्यातील १० हजारांहून अधिक तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शहरातील प्रमुख महिंद्रा सोना, महिंद्रा अँड महिंद्रा आणि बॉश या कंपन्यांवर अवलंबून असलेले लघू उद्योगदेखील अडचणीत आले आहेत.
वाहनांची विक्री कमी झाल्यामुळे वाहन उद्योगांच्या कंपनी व्यवस्थापनाकडून खर्चात कपात करण्यात येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून उत्पादन प्रक्रिया स्थगित करणे, ले ऑफ देणे, कंत्राटी कामगारांना काढून टाकणे, अधिकार्यांची कपात करणे असे निर्णय घेण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात १० हजारांहून अधिक कामगारांची कपात करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील टाटा मोटर्ससह इतर वाहन कंपन्यांनी उत्पादन बंद केले आहे.
वाहन उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या अडीच लाख कामगार कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. नोकऱ्या गेल्या असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी जगायचे कसे ? मुलांच्या शिक्षणाचे काय? आरोग्य प्रश्न निर्माण झाल्यास काय करावे ? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत.
कंपनी बंद पडली तर मालकाला फारसा फरक पडत नाही- डी. एल. कराड
कामगार आणि कर्मचाऱ्यांची नोकरी गेली तर त्यांचे कुटुंब रस्त्यावर येतात. कंपनी बंद पडली तरी त्याच्या मालकाला फारसा पडत नाही, अशी टीका सिटू संघटनेचे कामगार नेते डी.एल.कराड यांनी केली. पुढे ते म्हणाले, की सरकारने मंदीबाबत विचार विनिमय करून रोजगार निर्मिती होईल, असे निर्णय घ्यावेत. बेरोजगार झालेल्या कामगारांना कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल, असे निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेणे अपेक्षित आहे. जर सरकार हे संकट काळामध्ये नागरिकांच्या मदतीला धावून आले नाही तर मग सरकार कसले, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.