नवी दिल्ली - देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी भारतीय रिझर्व्ह बँक ही नियमनात अपयशी ठरल्याची टीका केली. आरबीआयच्या वित्तीय स्थिरता अहवालात (फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट्स) आयएल अँड एफएसचे संकट उद्भवू शकेल, असे कधीच म्हटले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. आयएल अँड एफएसम ही देशातील सर्वात मोठी बिगर बँकिंग वित्तीय संस्था आहे.
अरविंद सुब्रमण्यम म्हणाले, ताळेबंदात संतुलन राखणे हे देशासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. आरबीआय ही देशातील उत्कृष्ट संस्था आहे. मात्र, इन्फ्रास्ट्रक्चर लिजींग अँड फायनान्शियल सर्व्हिसेससारख्या (आयएल अँड एफएस) मोठ्या संस्थावर नियंत्रण ठेवण्यावर ती अपयशी ठरली आहे. गेल्या चार-पाच वर्षातील तुम्ही वित्तीय स्थिरता अहवाल पाहा. आएएल अँड एफसची समस्या होणार असल्याचा त्यामध्ये विशेष असा उल्लेख करण्यात आला नाही. काहीतरी त्याच्यासाठी पहायला हवे होते, असे त्यांनी मत व्यक्त केले.